अनिल साठे, भिंगारजिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले आहे. दुष्काळाची तीव्रता, पाण्याचे हाल व चाऱ्याचा तुटवडा लक्षात घेत गोठ्यातील गायी गोशाळेत पाठविल्या जात आहेत. अन्य जनावरे बाजारात आणणे शेतकऱ्यांना भाग पडले आहे. पशुधन जगवायचे कसे? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना अद्याप दुष्काळ तीव्रतेच्या आढावा बैठका व कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन व्यस्त आहे. पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. ऊस, मका, घास यांसारख्या चारा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. शेतकऱ्यांना गोठ्यामधील गाय, म्हैस, बैल, बकऱ्या यांसारखी जनावरे जगवायची तरी कशी, हा मोठा प्रश्न पडला आहे. मुबलक चारा नसल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागडा चारा आणण्यासाठी पैसे आणायचे तरी कोठून, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. यावर तोडगा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई गोशाळेत सोडल्या आहेत. म्हशी, बैल, बकऱ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने जनावरे रस्त्यावर मोकळे सोडण्यापलिकडे पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात अनेक समाजसेवी मंडळी, संस्था, देवालये यांच्या गोशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गोशाळा चालक नागरिकांची देणगी घेवून जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था करीत आहेत. दाखल होणाऱ्या गायींचा ओघ सुरूच आहे.
चाऱ्याअभावी पशुधन गोशाळेत
By admin | Published: March 16, 2016 8:29 AM