भाऊसाहेब येवलेराहुरी : सोनगाव (ता़ राहुरी) येथील अमृता चव्हाण या महिलेने मुंबईतील झोपडपट्टीत राहून चपात्या बनविण्याच्या व्यवसायात चांगलीच भरारी घेतली आहे. अमृताने खासगी नोकरीचा राजीनामा देऊन ५० चपात्यांपासून व्यवसाय सुरू केला. आज ती महिला ‘सुवर्णा अमृत ब्रॅँड’ नावाखाली प्रतिदिन कमीत कमी ५ हजार ते जास्तीत जास्त २७ हजारापर्यंत चपात्या बनवून विकते. यंत्राने नव्हे तर दहा महिलांकडून या चपात्या तयार केल्या जातात.अमृता चव्हाण यांनी कुंदा जाधव ही महिला चपात्या बनवित असल्याचे पाहिले.त्यांनी चपात्या बनविण्यामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. चपात्याचे पीठ मळणे, सारखा आकार, वजन, भाजणे याची संपूर्ण शास्त्रीय माहिती घेतली़ पहिल्या दिवशी ५० चपात्यांची ‘आॅर्डर’ मिळाल्याने अमृता यांचा आत्मविश्वास वाढला़ त्या दुचाकीवरून घरोघरी जाऊन चपात्या पोहच करू लागल्या. चपात्यांचा दर्जा पाहून मागणी वाढू लागली़ हळूहळू व्यवसायही वाढू लागला. त्यांनी सहा महिलांची चपात्या लाटण्यासाठी नियुक्ती केली. पिठाच्या दर्जापासून ते भाजून पॅकिंग करेपर्यंत कशी काळजी घ्यायची याची माहिती त्यांनी महिलांना दिली़ तयार झालेल्या दर्जेदार चपात्या ग्राहकांपर्यंत तत्पर कशा पोहचतील याची व्यवस्था केली़ विशेष म्हणजे चपात्यांना ताज हॉटेलचीही मागणी आली़ ताज हॉटेल व अन्य महत्वाच्या ठिकाणी चपात्यांच्या आॅर्डर मिळाल्या.त्यांनी चपाती निर्मिती व्यवसायाला सुवर्णा अमृत बँ्रड असे नाव दिले़ ताज हॉटेलमध्ये सचिन तेंडुलकर व अन्य क्रिकेटरनेही या चपात्यांचा आस्वाद घेतला. सचिननेही चपात्याच्या दर्जाबाबत कौतुकही केले़ उद्योजक, अभिनेते, मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यावरांच्या पसंतीला सुवर्णा अमृता ब्रँड उतरला आहे़ आता चपात्यांना परदेशातून मागणी आली पाहिजे यादृष्टीने अमृता यांची तयारी सुरू आहे़ चपातीचे वजन ३० गॅ्रम, रूंदी ९ इंच अशा पद्धतीने बनविल्या जातात़ दर्जेदार चपात्या कमी दरात ताज्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत़सातासमुद्रा-पलीकडे चपात्या जाव्यात ही माझी इच्छा आहे़ त्यादृष्टीकोनातून नियोजन सुरू आहे़ सुवर्णा अमृत बँ्रडने गुणवत्ता, वक्तशीरपणा, कष्ट, साधेपणा, नम्रता व पारदर्शकता याबाबत तडजोड केलेली नाही़ त्यामुळे नजीकच्या काळात चपात्या परदेशातही पसंतीला उतरतील. -अमृता चव्हाण,उद्योजिका, मुंबई
मुंबईच्या झोपडपट्टीत राहून ‘ती’ विकते प्रतिदिन २७ हजार चपात्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:34 PM