अहमदनगर- महाराष्ट्र सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.
राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन होता. त्यानुसार पूर्वीच्या आदेशाची मुदत आज संपली. त्यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार आहेत.
नवीन आदेशात काही नियमांचे पालन करून सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहणार आहेत. पूर्वीप्रमाणेच जिल्हाबंदी, तसेच हॉटेल, रेस्टारंट सुरू करण्यास मनाई असेल.
दुकानांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे अनिवार्य असेल. याशिवाय मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आदी नियम न पाळण्यास कारवाई करण्यात येणार आहे.शाळा, महाविद्यालयेही ३१ जुलैपर्यंत बंदच असणार आहेत.