बेलापूर : ग्रामपंचायत, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व व्यापारी संघटनेने शहरात लागू केलेल्या पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनला बेलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांच्या वतीने सर्वसंमतीने १९ ते २३ मे या कालावधीत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
कोरोना महामारीचे संकट भयावह असून या संकटाचा एकोपा व एकजुटीनेच मुकाबला करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य भविष्यात लाभावे, तसेच अनावश्यक गर्दी टाळावी. मास्कचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.
लॉकडाऊन यशस्वितेसाठी ग्रामस्थ, व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी व फळे विक्रेते, हॉटेलचालक, मांसविक्रेते, बेकरीवाले, पीठ गिरणीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक आदींचे सहकार्य लाभले. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सर्वांचे आभार मानले.