घारगाव : करोनाच्या पार्शभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असताना वाळू तस्करांकडून संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक मालक फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर, होमगार्ड मनोज थोरात हे बोटा शिवारात पेट्रोलिंग करीत असताना कच नदीच्या पुलावर आंबी दुमाला गावाकडे अवैध वाळू घेऊन जाताना ट्रॅक्टर मिळून आला. ट्रॅक्टर (एम.एच.-१७, बी.व्ही. ९४१३) व त्यास जोडलेली विनानंबरची ट्रॉली घारगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ताब्यात घेतली. पोलीस बघताच ट्रॅक्टर चालक, मालक पसार झाले. पोलीस नाईक संतोष विठ्ठल फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मुक्ताजी शिंदे व आत्माराम दशरथ नरवडे (रा.आंबीदुमाला, ता.संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहेत.
लॉकडाऊनमध्येही अवैध वाळू उपसा सुरूच; ट्रॅक्टर चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:24 AM