कोतूळ : शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत. कोतूळ गावात सध्या ७५ जण होम कोरोंटाइनर आहेत. तर आसपासच्या चाळीस गाव डांग भागात हा आकडा एक हजारांच्या वर आहे. पुणे, मुंबई व परराज्यातील कामगार या भागात आपल्या स्वगृही परतले असल्याने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांना होम कोरोंटाइन केले आहे. मात्र कोतूळ ही परिसराची व्यापारीपेठ असल्याने कोतूळात परगावातील असंख्य लोक सकाळी भाजी व इतर खरेदीसाठी सकाळी सात ते दहा या कालावधीत मोठी गर्दी करतात. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्स न पाळता हा बाजार भरत असल्याने कोतूळ गावात धोक्याची घंटा वाजली आहे. कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे व विजय खुळे व ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला. परंतू रात्री उशिरापर्यंत पहारा देणारे कर्मचारी सकाळी नऊ दहा वाजता नाकेबंदी करतात. त्या आगोदर तीस, पस्तीस भाजी व्यापारी मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटल्याने गर्दी वाढते. विशेष म्हणजे यात एकही शेतकरी नसून परगावातील व्यापारी हा माल विकतात. तर शासनाने कोरोना बचावासाठी ठरवून दिलेले नियमांना पायदळी तुडवले जाते.
‘लोकमत’ने पाच दिवसांपूर्वी अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना ही माहिती दिली. मात्र भाजी विक्रेत्यांना कोणतेही नियम नाहीत. ती जीवनावश्यक वस्तू असल्याने कोठेही विक्री करू शकतात. त्यांना कोणतेही निर्बंध नाहीत असे त्यांनी सांगितले.