लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. या काळात शहरातील कापड बाजार परिसरातील रस्त्यांची कामे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली असून, या कामांना वेग आला आहे.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता, बागडपट्टी आदी भागांतील रस्त्यांची कामे रखडली होती. शहरातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्याने रस्त्यांची कामे पूर्णपणे थांबलेली होती. भुयारी गटार योजनेच्या कामाला वाहतुकीचा अडथळा होता. कडक लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. नागिरकही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील सुमारे १५ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात असून, उर्वरित रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याचेही काम रखडले होते. हे कामही महापालिकेने हाती घेतले आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. वाहतूक नसल्याने या कामालाही वेग आला आहे.
....
कोरोनामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक नाही. शहरातील रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कामांना गती देण्यात आली असून, शहरातील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केले जातील.
- सुरेश इथापे, शहर अभियंता.