अहमदनगर : लोकांचा समज होता की, माझे आणि मोदींचे चांगले संबंध आहेत, होतेही. ते मुख्यमंत्री होते. मी देशाचा कृषिमंत्री होतो. देशातला कोणताही मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आला की मदत करण्याची भूमिका होती. त्यावेळी पक्ष बघायचा नाही. एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथील सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, माझ्या बोटाला धरून राजकारणात आले हे खरं आहे. शेजारील राज्य आहे म्हणून मदत केली. मी शेतीमालाला भाव वाढविण्याची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली होती. त्यानंतर प्रधानमंत्री मला आल्यावर मागणी योग्य नसल्याचे बोलले. सरकारचे धोरण स्वत: ला प्रसिद्धी करण्याचे आहे. पाच वर्षात २४५ कोटी जाहिरातींवर खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ महिन्यांमध्ये ९२ वेळा परदेशात गेले. या दौऱ्यासाठी दोन हजार कोटी खर्च केला. काळा पैसा आणण्याचे सांगितले. लोकं वेडी झाली. स्वित्झर्लंडला गेले. सर्वांना भेटले. हात हालवत माघारी आले. आणि सांगायचं काय हा प्रश्न होता. रात्रीच नोटाबंदी केली. अख्खा देश रांगेत उभा राहिला. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत.
आतापर्यंत गांधी परिवाराला शिव्या घातल्या. आता माझा नंबर. वर्ध्याला माझ्याबद्दल बोलले. आमच्या कुटुंबावर बोलता. सांगतात काय, आमच्या घरात भांडणे आहेत. अरे स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात. उगाच जास्त बोलत नाही. महाराष्ट्रातील लुंग्यापुंग्याच्या टीकेला मोजत नाही, असेही शरद पवार म्हणाले.