अहमदनगर : आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती सरसावल्या आहेत़ घरातील कामे बाजूला ठेवून प्रचारासाठी दिवस उगवताच त्या घराबाहेर पडत आहेत़ पतिराजांप्रमाणेच त्यांचेही दिवसभराचे ‘शेड्यूल’ ठरलेले आहे़ दिवसभर मतदारसंघात फिरून त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत़ भावनिक आवाहनामुळे त्यांचा हा प्रचार प्रभावी ठरत आहे़अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या होत असलेल्या निवडणुकीत पतिराजांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवतीही चांगल्याच सरसावल्या आहेत़ पतिराजांना खासदार करण्यासाठी सौभाग्यवती पायाला भिंगरी लावून फिरत आहेत़ युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे नगर शहरातून प्रचाराची खिंड लढवत आहेत़ त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप यांनी नगर, राहुरीचा दौरा करून रविवारी नगर शहरातील मतदारांच्या घरोघरी गाठीभेटी घेतल्या़ पतिराजांची भूमिका मतदारांसमोर मांडून या रणरागिणी मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत.आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पत्नी तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत़ त्यांना प्रचाराचा दांडगा अनुभव आहे़ भाजपाचे नगर- राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या त्या कन्या आहेत़ वडिलांचा प्रचार त्यांनी जवळून पाहिलेला आहे़ यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये वडिलांची मदत होत होती़ यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे़ जावई विरुध्द सासरे, अशी लढाई आहे़ म्हणून वडिलांच्या राहुरी मतदारसंघात शीतल जगताप यांनी दौरा केला व पति संग्राम जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन केले़ त्यांनी वडिलांचे ऐकू नका, मला मदत करा, अशी हाक दिली़ महिला कार्यकर्त्यांसह सौभाग्यवती शहरातील दररोज एका भागाचा दौरा करून प्रचार करत आहेत़ त्यासाठी त्या सकाळीच घरातून बाहेर पडतात़ कोणत्या भागात किती वाजता दौरा करायचा, हे वेळापत्रक घेऊनच त्या घराबाहेर पडतात़ दोन्ही पक्षांकडे महिला कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे़ त्यांच्या बैठका घेऊन शहरातील विविध भागातील प्रचार फेऱ्या, महिला मतदारांच्या गाठीभेटींवर सौभाग्यवतींचा भर आहे़शीतल जगताप यांच्या माहेरच्यांची अडचणयुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री यांचे माहेर औरंगाबाद आहे़ त्यांचे वडील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आहेत़ माहेरची मंडळी जावई सुजय यांच्या प्रचारासाठी सहभागी होतील.पण, शीतल जगताप यांचे वडील विरोधी पक्षाचे आमदार असल्याने संग्राम यांच्या प्रचारासाठी माहेरून कुणी येण्याची शक्यता नाही़ त्यामुळे स्वत: शीतल याच प्रचारात उतरल्या आहेत़
Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये उमेदवारांच्या होम मिनिस्टर प्रचाराच्या मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:55 AM