अहमदनगर - ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या जालिंदर चोभे यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी वस्तू मशीनवर मारून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती.
मतदान यंत्राजवळ मतदानासाठी आत गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनात नेले. तेथून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदी दिग्गज रिंगणात आहेत. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक ४ महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या.