अहमदनगर : डॉ.सुजय विखे बोलेपर्यत मला शंकाच होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारत नाहीत. आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहे. पार्थ सरस की रोहित असे विचारल्यानंतर पवार महत्त्वाचे असल्याचे सांगतात. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीतील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्यावर आक्षेप घेणा-या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. पण लोक हुशार झाले आहेत. आमचे विरोधक म्हणतात हेबाहेरचे आले. यांना कळते का कोण बाहेरचे आहे? आम्ही येथेच जन्मलो आहोत आणि लहानाचे मोठे झाले आहे. आजकालची तरुण पोरं भाषण करतात का याविषयी मला शंकाच आहे. सुजय एक तरूण आहेत. त्यामुळे ते बोलेपर्यत मला शंका होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. बीड आणि अहमदनगरमध्ये शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार होणार आहेत. डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारात नाहीत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामधील कोणता नेता उत्कृष्ट आहे ? असा प्रश्न आमच्या भावाला विचारला. त्यावेळी ते म्हणाले. पार्थ आणि रोहित महत्वाचा नाही तर पवार महत्वाचे आहेत. अरे किती पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली. हे दिसत नाही. आणि इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते. नगरमध्ये सगळीकडून घुसखोरी सुरु आहे. राम शिंदे यांच्या मतदारसंघातही बारामतीची घुसखोरी सुरु आहे. तिथे बाहेरचा दिसत नाही. प्रियांका गांधी यांना चालतात. तिथे नाही विचारत नाही वड्रा नाव का लावता. आमचे उमेदवार इथलेच उमेदवार आहेत. याच मातीतला उमेदवार आहे. आम्ही काय पाकिस्तान, चायनातून आलो आहोत का ? असे टीकास्त्र मुंडे यांनी सोडले.