शिर्डी - लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली.
शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस विरोधात टीकेची झोड उठवणारे राधाकृष्ण विखे यांच्यातील राजकीय संघर्ष येथे टोकाला पोहोचला आहे. थोरात यांनी कांबळे यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत अनेक नेत्यांची मोट बांधली आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांनीही शिवसेना उमेदवार लोखंडे यांच्याकरिता अखेरच्या टप्प्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे पुत्र व नगरमधून भाजपकडून निवडणूक लढविलेले उमेदवार डॉ. सुजय विखे यांनीही श्रीरामपूर, संगमनेर, राहाता येथे सभा घेतल्या.
दरम्यान, सकाळी मतदानास सुरुवात होताच श्रीरामपूर शहरातील अनेक मतदान केंद्रावर यंत्रे बिघडल्याच्या तक्रारी पुढे आल्या. देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील माका, श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव, शहरातील बालिका विद्यालय, मॉडेल स्कुल येथे बिघाड झाले. मात्र ते तातडीने दुरुस्त करून देण्यात आले.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेऊन मतदान केले. त्यानंतर ते प्रत्येक तालुक्यातील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी निघाले आहेत. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहरातील नगरपालिका शाळेत मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाने दोनशे मीटरच्या आत वाहने लावण्यास व जमावाने फिरण्यास अटकाव केला आहे. राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधी यांना मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांकडूनही केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल काढून घेतले जात आहे.