राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली.यानंतर दोघांनीही राहुरीत सुजय विखे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. राहुरी येथे पोहोचल्यानंतर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन विखे-कर्डिले यांनी राहुरी शहरातील ३६ बुथचा आढावा घेतला़ विविध समाजातील नागरिकांशी चर्चा करून दक्षिण नगर मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्यासाठी बांधणी केली़बारागाव नांदूर येथे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांचा दशक्रिया विधी होता़ यावेळी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते़ श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी गेले़ कार्यक्रमानंतर राधाकृष्ण विखे हे गर्दीत आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतीक्षा करीत होते़ आमदार कर्डिले येताना दिसताच त्यांना स्वत:च्या गाडीत घेऊन राहुरीच्या दिशेने प्रवास केला़प्रवासात विखे-कर्डिले यांच्यात राहुरी मतदार संघातील सद्य:परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते़ राहुरीतून अधिक मताधिक्य मिळण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर विखे-कर्डिले यांनी राहुरीतील काँगे्रसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांचे निवासस्थान गाठले़ तेथे राहुरी शहरातील विविध समाजातील मतदारांशी विखेंनी संवाद साधला़ राहुरी शहरातील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला़विखे-कर्डिलेंसमवेत अॅड़ सुभाष पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख रावसाहेब खेवरे, तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले, सुरसिंग पवार, डॉ़ संजय भळगट, डॉ़ धनंजय मेहेत्रे, सुभाष वराळे, बापू वराळे, प्रमोद सुराणा, गोपाळ अग्रवाल, दिलीप राका, अण्णासाहेब शेटे, सोन्याबापू जगधने, अरूण साळवे, विलास साळवे, दीपक मेहेत्रे आदी उपस्थित होते़साडेचार तास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आढावा बैठक घेतली़ यानिमित्त ९०० जणांशी संवाद साधला़ राधाकृष्ण विखे हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत़ त्यामुळे त्यांनी आता थेट सुजय यांच्यासाठी बांधणी सुरु केली आहे़
Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे- शिवाजी कर्डिले यांचा सोबत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:58 AM