अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना रिगणात उतरविण्यात आले आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्याशी आमदार संग्राम जगताप यांचा थेट सामना होणार आहे.
आमदार संग्राम जगताप हे बी.कॉम आहेत. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ (गंगाधारशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय) याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वडील अरूण जगताप हे विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. वडील दुस-यादा स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झाले आहेत. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे ते जावई आहेत. आमदार संग्राम जगताप पहिल्यांदा २००९ मध्ये अहमदनगर महापालिकेच्या नगरसेवक पदी निवडून आले. याचवेळी पहिल्यांदा ते महापौैर झाले.
२०१४ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा ते निवडून आले. त्यावेळी दुस-यांदा ते महापौर झाले. महापौर पदावर असतानाच त्यांनी २०१४ मध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. त्यांनी सेनेचे उपनेते अनिल राठोड आणि भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांचा पराभव केला. पत्नी शितल जगताप दोनदा नगरसेवक झाल्या असून विद्यमान नगरसेविका आहेत. आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटाचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. भावजय सुवर्णा सचिन जगताप या मांडवगण गटातून अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या विद्यमान सदस्या आहेत.