चंद्रकांत शेळके अहमदनगर : तरूणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालात म्हटले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्याची मतदारसंख्या पाहता त्यावर शिक्कामोर्तबच होते. कारण जिल्ह्याच्या एकूण ३४ लाख मतदारांपैकी १५ लाख मतदार (४५ टक्के) हे तरूण आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही दोन तरूण उमेदवारांतच लढत होत आहे. त्यामुळे तरुणांची मते कोणाच्या पारड्यात पडणार ते निकालानंतर स्पष्ट होईल.अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तर अहमदनगर मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड असे सहाच विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण ३३ लाख ९३ हजार मतदार असून त्यात १७ लाख ७१ हजार पुरूष,तर १६ लाख २१ हजार स्त्री मतदार आहेत. यातही शिर्डी मतदारसंघात एकूण १५ लाख ६१ हजार, तर अहमदनगर मतदारसंघात १८ लाख ३१ हजार मतदार आहेत. या सर्वच मतदारसंघांत तरूण मतदारांची संख्या जास्त आहे.अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप या दोन तरूणांत ‘टशन’ होणार आहे. हे दोन्ही उमेदवार पस्तीशीतील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तरूणांचा उत्साह पहायला मिळतो आहे. दोन्ही उमेदवारांच्या सभेलाही तरूणाईच ‘चिअर’ करताना नजरेस पडते. ‘तरूणाई निवडणुकीपासून बाजूला असते’, असा कथित आरोप या मतदारसंघात सध्यातरी लागू नाही. मतदारयादीवर नजर फिरवली तर तब्बल १५ लाख मतदार चाळिशीच्या आतील आहेत. त्यातही सर्वाधिक सुमारे साडेसात लाख मतदार ३० ते ३९ वयोगटातील आहेत. त्यानंतर २० ते २९ वयोगटात सात लाख मतदारांची नोंदणी आहे. याशिवाय ६८ हजार नवमतदार १८ ते १९ या वयोगटातील आहेत.असे हे तरूणच दोन्ही मतदारसंघांत महत्त्वाची भूमिका बजावून आगामी दोन्ही खासदारांसाठी दिल्लीचे दरवाजे उघडणार आहेत.तालुकानिहाय तरूण मतदारांची संख्या - शेवगावमध्ये सर्वाधिक तरूणअकोले 114028संगमनेर 120499शिर्डी 119424कोपरगाव 121166श्रीरामपूर 127808नेवासा 113714शेवगाव 151229राहुरी 127159पारनेर 138888अ.नगर शहर 126161श्रीगोंदा 133724कर्जत-जामखेड 135726१९५१ मतदार शंभरी पारएकूण ३४ लाख मतदारांमध्ये १९५१ मतदार शंभरी पार केलेले (शतायुषी) आहेत. याशिवाय ९० ते ९९ या वयोगटात १६ हजार ७५ मतदारांचा समावेश आहे. ८० ते ८९ या वयोगटात ९५ हजार ३९९, ७० ते ७९ वयोगटात २ लाख १ हजार ९१२, तर ६० ते ६९ वयोगटात ३ लाख ४० हजार ५८० मतदार आहेत. असे एकूण ६ लाख ५५ हजार ९१७ मतदारांनी साठी ओलांडलेली आहे.
Lok Sabha Election 2019 : तरूण ठरवणार भावी खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:23 PM