भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:25 AM2024-05-10T10:25:08+5:302024-05-10T10:30:12+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहे.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. काल अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये सभा झाली. या सभेत आमदार सुरेश धस यांनी खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार, निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आमदार धस यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
"राजकारणात नवीन पायंडा पडू देऊ नका, काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त. असा सध्या जमाना येत आहे. कोविडच्या काळात आम्ही १३ हॉस्पिटल आणि ३४ कोविड सेंटर आम्ही चालवली. हे करत असताना आम्हाला त्याच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर रिल करायला वेळ मिळाला नाही, पण आजकालचा जमाना असा झाला आहे, असा टोला आमदार सुरेश धस यांनी निलेश लंके यांना लगावला. "कोविड काळात सुजय विखे पाटील यांनी चांगलं काम केलं. त्यांनी पाहिडे तेवढी औषध आणली. आजही त्यांच्याकडे रुग्ण उपचार घेऊन येतो. पण त्यावेळी जे सरकार होतं ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं,त्यांनी त्यावेळी तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी एवढच केलं, अशी टीका सुरेश धस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
आमदार सुरेश धस म्हणाले, राज्यात पक्ष फोडण्याची सुरुवात भाजपाने केली. एकत्र लढले आणि शेवटला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. धोका यांनीच आम्हाला दिला आहे.आमच्या पाठीत खंजीर यांनीच खुपसला, असा आरोपही धस यांनी केला.
'बारामतीच घर फुटल्यावर कसं काय वाईट वाटतं'
यावेळी आमदार सुरेश धस यांनी खासदार शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. "राज्यात दुसरा एक पक्ष आहे त्यांचं उभ आयुष्य पक्ष फोडण्यात गेलं. त्यांचं आयुष्य पक्ष फोडण्यात नाही तर घर फोडण्यातही गेलं आहे. मग आता तुमच घर फुटलं तुम्हाला का वाईट वाटतं, मोहिते पाटील यांचं घर फोडलं, गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं महाराष्ट्रातील कोणाच घर राहिलं ते सांगा. मग आता बारामतीच घर फुटल्यावर कस काय वाईट वाटत आहे, अशी टीका शरद पवार यांचं नाव न घेता सुरेश धस यांनी केली.
"बारामतीमध्ये भाजपाच्या मदतीने घड्याळ निवडून आलं आहे, असं माझं ठाम मत आहे. ते आदल्या दिवशीच कळालं आहे. इलेक्शनच्या आधी दोन दिवस जे पक्ष रडारडी करतात त्या पक्षाच दोन दिवसांनी काय होणार आहे हे कळतं, असा निशाणा रोहित पवार यांच्यावर लगावला. मतदानादिवशी बारामतीमधील उमेदवार अजितदादांच्या मातोश्रींना भेटायला गेले, मग याआधी का भेटायला तुम्ही गेला नाहीत, असा सवालही सुरेश धस यांनी केला.