अण्णा नवथर , अहमदनगर: महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तू किस झाड की पत्ती है , असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबाबत येथे केले.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पारनेर येथील बाजार तळावर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
अजित पवार यांनी थेट लंके यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. निलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे, असे सांगून माझ्या नादाला लागू नको माझ्या नादाला लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे, असे पवार म्हणाले.
पारनेर करांच्या मागणीनुसारच मी निलेश लंके यांना विधानसभेला उमेदवारी दिली होती. परंतु मागणी करणारे ही या ठिकाणी उपस्थित आहेत, असा टोला पवार यांनी स्वपक्षांना लगावला. दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही, हे खरे आहे, अशी कबुली पवार यांनी या भाषणात दिली. आचारसंहितेनंतर हे अनुदान दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.