Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये पहाटे घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरू असते. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. 'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, यावेळी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी शरद पवार यांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला, यामुळे पहाटेचा शपथविधी झाला',असा दावा अजित पवार यांनी काल केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. या दाव्याला आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'भाजपासोबत जायला आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि राहणार नाही', असं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. काल अजित पवार यांनी एका सभेत बोलताना पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला होता. अजित पवार म्हणाले होते की, २०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तास्थापन होण्यापूर्वी आमची एका बड्या उद्योगपतींच्या घरी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत खातेवाटपही झाले होते. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसही सोबत होते. पण, शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला. मी शब्द पाळणारा आहे, मला अमित शाह यांचा फोन आला, त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली', असंही अजित पवार म्हणाले होते.
'जागावाटपावरुन मतभेद होत असतात'
शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडी निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसू आणि पर्याय देऊ, काही ठिकाणी जागेवरुन मतभेद होत असतात.पण, मतभेदाकडे लक्ष द्यायच नाही.निवडणूक लढवायची, जागा जिंकायची आणि जिंकल्यानंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. त्यावेळी आम्हाला कोणालाही पुढं करता येईल आणि स्थिर सरकार शक्य आहे, असंही शरद पवार म्हणाले.
'आजपर्यंत ईडीचा गैरवापर झाला नाही'
ईडी कारवाईवर बोलताना शरद पवार म्हणाले, आजपर्यंत ईडीचा एवढा गैरवापर झाला नाही. देशातील दोन राज्यातील मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. ईडीचा वापर करुन त्यांना आत टाकलं आहे. ईडीचा गैरवापर अमित शाह आणि त्यांच्या पक्षाने केला आहे, असा आरोपही खासदार शरद पवार यांनी केला.