अहमदनगर - जातीच्या अंतासाठी लढणा-या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज अहमदनगर येथे केली.
यावेळी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले की, अॅड. आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा अशी त्यांची मागणी होती प्रत्यक्षात मात्र त्यांनीच त्यांच्या उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे. आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असाही सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्ष यांची महाअघाडी आहे. आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील चार जागांची मागणी केली आहे. यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान दोन जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण स्वत: निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही असे कवाडे यांनी सांगितले.
सुजय विखेंच्या डोक्यात फरक डॉ. सुजय विखे हे न्युरोसर्जन आहेत. सध्या मात्र त्यांच्या डोक्यात फरक दिसत आहे़ सत्तेसाठी त्यांनी राजकारण केले. काही लोकांना तात्काळ सत्ता हवी असते. नेता होण्याचा ते प्रयत्न करतात. सुजय हे त्यातलेच एक आहेत. अशी टीका जोगेंद्र कवाडे यांनी केली.
शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता त्यावरुन प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकाही झाली. मात्र ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल. आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.