अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत उमेदवार करत असलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. या उमेदवारांना तीन टप्प्यात खर्च सादर करायला सांगितला असून निवडणूक आयोग स्वत:ही या खर्चावर लक्ष ठेवत आहे. त्यानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा खर्च सर्वाधिक ३० लाख आठ हजार रूपये नोंदवला गेला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा खर्च ८ लाख रूपये आहे. या खर्चातही तफावत आढळल्याने खर्च नियंत्रक पथकाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांनी प्रचारादरम्यान तीन वेळा खर्च सादर करायचा आहे. त्यात उमेदवारांनी सादर केलेला खर्च व अभिरूप निरीक्षण नोंदवहीतील तपशिलाचा ताळेबंद करून त्यातील तफावत इतर अहवाल तत्काळ आयोगास सादर करण्यात येत आहेत. शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांची पहिली खर्च तपासणी झाली असून त्यात सर्वाधिक खर्च सेनेचे उमेदवार लोखंडे यांचा आहे. त्यांनी २४ लाख ८३ हजार ४९८ रूपयांचा खर्च दाखवला आहे. तर अभिरूप नोंदवहीत त्यांचा खर्च ३० लाख ८ हजार ६७३ रूपये नोंदवलेला आहे. त्यामुळे ५ लाख २५ हजार १७५ रूपयांची तफावत त्यांच्या खर्चात दिसत आहे. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी ३ लाख ८४ हजार ३३९ रूपयांचा खर्च सादर केला आहे, तर अभिरूप नोंदवहीत त्यांचा खर्च ८ लाख ८ हजार ६४४ रूपये दाखवला आहे. त्यामुळे यातही ४ लाख २४ हजार ३०४ रूपयांची तफावत आहे. याबाबत तफावत आढळलेल्या रकमेचा पुरावा सादर करावा, अन्यथा निवडणूक खर्चात ही रक्कम समाविष्ट केली जाईल, अशा नोटिसा या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, बन्सी सातपुते व शंकर बोरगे हे दोन उमेदवार खर्च सादर करण्यास अनुपस्थित होते. त्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारांची पुढील खर्च तपासणी २६ एप्रिल रोजी होणार आहे.