मांडवगण : कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी मांडवगण (ता. श्रीगोंदा) प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. गर्दीमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली होती. दूरवरून येणाऱ्या लोकांना तासन् तास ताटकळत उभे रहावे लागत असल्याने आरोग्य उपकेंद्रावरही लसीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाची वाढती रुग्ण व मृतांची संख्या लक्षात घेऊन सुरूवातीला लसीकरणाकडे ढुंकून ही न पाहणारे लोक आता भीतीपोटी लसीकरणाकडे वळत आहेत. मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीच्या उपलब्धतेनुसार साधारण आठवड्यातून दोन दिवस लसीकरण होते. या प्राथ. आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मांडवगण, महांडुळेवाडी, कामठी ,बनपिंप्री ,घोगरगाव, तरडगव्हाण, चवर सांगवी ,थिटेसांगवी, रूईखेल, बांगर्डे, खांडगाव, वडघूल, पिसोरेखांड, देऊळगाव, बेलवंडी कोठार आदी गावांचा समावेश होतो.
वरील गावातील लोकांना मांडवगणला येणे गैरसोयीचे आहे. तसेच लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असल्याने नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. सर्व बाबींचा विचार करता आरोग्य उपकेंद्रावरही लसीकरण सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
१२ एप्रिल रोजी काही पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रदीप पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. सध्या विविध गावचे सरपंच, माजी सरपंचांनी ही तशी मागणी केली आहे.
---
२६ मांडवगण
मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लागलेल्या रांगा.