अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दादा कळमकर, नरेंद्र घुले, अॅड. प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई येथे शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत या तिघांनीही शरद पवार यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबई येथे सकाळी बैठक झाली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीला जिल्ह्यातून आ. राहुल जगताप, माजी आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते.या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा सुरवातीला आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातून या बैठकीसाठी मोजक्याच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. या पूर्वी झालेल्या बैठकीत आ. अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांना या बैठकीचा निरोपही नव्हता. शहरातून दादा कळमकर यांनी नगर दक्षिणेतून उमेदवारी करण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. जगताप यांचा पत्ता कट झाल्याने कळमकर यांचा पक्ष विचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.शेवगावचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनीही उमेदवारी करण्याबाबत बैठकीत तयारी दर्शविली आहे. त्यांचे बंधू चंद्रशेखर घुले गतवेळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बंधू नरेंद्र घुले यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी चंद्रशेखर घुलेही तयारीत आहेत.अॅड. प्रताप ढाकणे यांनी मागील बैठकीतही आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. या बैठकीतही त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या तीन नेत्यांपैकी की आणखी कोणाची उमेदवारी जाहीर होते, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
लोकसभेसाठी कळमकर, घुले, ढाकणे इच्छुक :शरद पवार यांच्याकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 3:29 PM