नेवासा (जि. अहमदनगर) : नेवासा फाटा येथे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पोलीस असल्याचे भासवून व्यापाऱ्याची ९ लाख रुपयांची गाडी व रोख रक्कम ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. व्यापाऱ्याला लुटण्याची घटना याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नेवासा पोलिसांत व्यापारी युनूस बुगण शेख रा. वळण राहुरी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रविवार दि.१० डिसेंबर रोजी नेवासा भागातील कापूस व्यापाऱ्यांना देण्यासाठी मारुती गाडी व्हिटारा ब्रिझा (क्रमांक एमएच १७ बिव्ही १३५२) यामध्ये ५ लाख रुपये घेऊन शेख आले होते. नेवासा खुर्द भागातील व्यापारी विजय राशीनकर यांच्याकडे त्यांची कापसाची गाडी भरत होती. मात्र कापूस कमी पडल्याने उस्थळ दुमाला येथील दुसरे व्यापारी रामेश्वर दिगंबर सिदलंबे यांच्याकडे जाऊन कापसाची बोलणी करून कापसापोटी त्यांना १ लाख रुपये दिले. नेवासा फाटा येथून नेवासाकडे येण्यासाठी निघालो असता रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट,पांढरा शर्ट व जर्किंग तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटार सायकलवर बसलेल्या एका इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यावरून वाहतूक पोलिस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला, मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलीस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर या इसमाने मोटारसायकल क्रमांक एमएच १९ एएस १५५३ या वरून पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले. गाडी चालवताना फोनवर बोलतो असे म्हणत गाडीच्या मागे दुचाकी लावून मला बोलवत लायसन्स व कागदपत्राची मागणी केली असता. मी कागदपत्र असल्याचे सांगितले परंतु लायसन्स नाही असे सांगताच गाडी पोलीस ठाण्यात न्यावी लागेल असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलीस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वतः ड्रायव्हर शीटवर बसून मला मोटारसायकल मागे घे व तू पलीकडून येऊन गाडीत बस असे सांगितले मी मागे गेलो असता तो गाडी घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत ९ लाख तसेच ४ लाख रुपये रोख असा एकूण १३ लाख रुपयांची लूट झाली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.अधिक तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेवासा फाट्यावर कापसाच्या व्यापाऱ्याला लुटले, ९ लाखांच्या गाडीसह ४ लाखांची रोख रक्कम पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:30 PM