अहमदनगर : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून पुरंदर (जि़ पुणे) येथील दोघा व्यावसायिकांना पांढरीपूल येथे जबर मारहाण करून चोरट्यांच्या टोळीने त्यांच्याकडील ९ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली़याप्रकरणी दीपक नामदेव थोपटे (वय ५१ रा़ पिंपरे खुर्द ता़ पुरंदर जि़ पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ थोपटे व त्यांचे मित्र कैलास दादासाहेब गोपणर यांचा पुरंदर परिसरात बांधकामाचा व्यवसाय आहे़ थोपटे यांना ८ जानेवारी रोजी नगर येथून एका व्यक्तीने फोन केला़ घराचे काम करत असताना एक सोन्याची कळशी सापडली आहे़ या सोन्याचे काय करावे, याबाबत आपण मार्गदर्शन करा, असे म्हणून थोपटे यांना पांढरीपूल येथे बोलावून घेतले़ थोपटे हे त्यांचे मित्र गोपणर यांना घेऊन शनिवारी दुपारी पांढरीपूल येथे आले़समोरील व्यक्तीने त्यांना रस्त्यापासून दूर असलेल्या डोंगराळ परिसरात बोलावून घेतले़ हे दोघे तेथे गेले तेव्हा सात ते आठ जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करत या दोघांकडील रोख रक्कम, मोबाईल, अंगावरील सोन्याचे दागिने असा ८ लाख ७९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण हे पुढील तपास करत आहेत़सोन्याच्या तुकड्याने केला घातचोरट्यांनी चाणाक्षपणे कट रचून थोपटे व त्यांच्या मित्रांची लूटमार केली़ घरात सोन्याची कळशी सापडली आहे़ येथे आमचा कुणावर विश्वास नाही़ तुम्ही येऊन खात्री करा आणि मार्गदर्शन करा असे म्हणून थोपटे यांना चोरट्यांनी ९ जानेवारी रोजी पांढरीपूल येथे बोलावून घेतले़ यावेळी त्यांना एक सोन्याचा शिक्का व एक सोन्याच्या अंगठीचा तुकडा दिला़ या दोन्ही वस्तू खरोखर सोन्याच्या होत्या़ थोपटे यांनी पुरंदर येथे गेल्यावर एका सराफाला शिक्का आणि तुकडा दाखविला तेव्हा हे खरे सोने आहे असे त्यांना सांगितले़ यामुळे थोपटे यांचा या कळशी सापडल्याच्या कथानकावर विश्वास पटला़ त्यानंतर पुन्हा खात्री करण्यासाठी ते मित्रासोबत पांढरीपूल येथे आले आणि चोरट्यांच्या जाळ्यात सापडले़
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटले : पांढरीपूल येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:07 PM