अहमदनगर : स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला नगरजवळ तीन लाखांना लुटले. नगर-दौंड रस्त्यावरील जाधववस्तीजवळ २१ जानेवारीला ही घटना घडली.याप्रकरणी राजू कांबळेसह इतर अनोळखी तिघांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नेवासे येथे खोदकामात पुरातन तांब्याच्या कलशात दीड किलो सोने सापडले असून ते विकायचे आहे, असे सांगत राजू कांबळे याने त्याच्या ओळखीच्या पुणे जिल्ह्यातील शेतकरी योगेश बबन केदारी (रा. कुसगाव, ता. मावळ) यांना नगरला यायचे सांगितले. त्यानुसार योगेश केदारी व त्यांचा साथीदार शिवाजी गायकवाड हे दोघे २१ जानेवारी रोजी नगरलाआले.कांबळे याने त्यांना नगर-दौंड रस्त्यावरील जाधव वस्तीपासून २०० मीटर अंतरावरील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी अगोदरच तीन ते चारजण बसले होते. त्यांनी अचानक हल्ला करून केदारी यांच्याकडून सोने नेण्यासाठी आणलेली २ लाख ७० हजारांची रक्कम, ५८ हजार रूपयांचे सोने, ७ हजारांचे दोन मोबाईल असा ३ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल लुटला.या मारहाणीत शिवाजी गायकवाड जखमी झाले. पोलिसांनी राजू कांबळेसह इतर अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:58 PM