शिर्डी : साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांची साईयंत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या शिर्डीतील १२ कमिशन एजंटाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र यावेळी प्रथमच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने एजंटांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.शिर्डी येथील लक्ष्मीनगर ते साईबाबा मंदिर गेट क्रमांक एक दरम्यान दर्शनासाठी येणाºया भाविकांची सदर कमिशन एजंट साईयंत्र दाखवून फसवणूक करीत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी धडक मोहीम राबविली.सोमवारी (दि.७) भाविकांची फसवणूक करणाºया बारा जणांना ताब्यात घेतले. त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सागर ननवरे (वय २९, रा.सावळीविहीर), हनुमान इखे (वय २७, रा.कालीकानगर, शिर्डी), शाकीत तांबोळी (वय ३८,रा. श्रीरामनगर), राजू शेख (वय ४१, श्रीरामनगर), प्रकाश पवार (वय ४९, चौधरीशाळा), हरीश गालफाडे (वय २६, ननेरावाडी), सलीम सय्यद (वय ३४, भिमनगर), बळीराम डुबे (वय ३५, इनामवाडी), विजय गुंजाळ (वय ४८, सावळीविहीर), सतीश शिरसाठ (वय ३०, द्वारकानगर), नाना साळुंखे (वय ३३, रा.सावळीविहीर), शरद कांजाळे (वय ४३, रा.मंचर,पुणे) असे कारवाई केलेल्या कमिशन एजंटांची नावे आहेत.साईबाबांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची साईयंत्र दाखवून दिशाभूल केली जात आहे. तातडीने साईभक्त निवासात रुम मिळेल. झटपट व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळेल, अशी बतावणी करुन भाविकांची फसवणूक केली जाते. भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर यापुढे अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. -सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी, शिर्डी.
साईयंत्राच्या माध्यमातून भाविकांची लूट : १२ कमिशन एजंटांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:29 PM