अहमदनगर : जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे अंतिम करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. गावपातळीवरील आराखडे तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मान्यता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदींची उपस्थिती होती. सध्या या अभियानातील २०१८-१९ साठी निवडलेल्या गावांत सर्व यंत्रणांनी शिवार फेरी केल्या असतील. त्यानंतर फोटोसह गावआराखडा जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन २०१७-१८ मधील उर्वरित कामे संबंधित यंत्रणांनी आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश द्विवेदी यांनी दिले. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी या कामांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक कामांवर पर्यवेक्षण होणे गरजेचे आहे. त्या कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याबाबत सर्व यंत्रणाप्रमुखांनी लक्ष घालावे, असे निर्देश द्विवेदी यांनी दिले.... तर शेततळे रद्द करामागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत ९४८३ शेततळी पूर्ण झाली आहेत. मात्र कार्यारंभ देऊनही कामे सुरू न करणा-या शेततळ्यांचे मंजुरी आदेश रद्द करून इतरांना ते मंजूर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत आपल्याला असलेले उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कृषीसह इतर यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.