बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीसह मुरमी, बाडगव्हाण, शेकटे, सुकळी, हातगाव, गायकवाड जळगाव, कांबी, मुंगी, लाड-जळगाव, बोधेगावसह परिसरात बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने या भागातील कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पिकावर केलेला खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झाली आहे.या भागात कपाशी पीक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शेतक-यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कपाशी पिकावरच अवलंबून आहे. कपाशी पीक सुमारे ५० ते ६० टक्के येणे बाकी असताना बोंड अळीच्या रोगाने डोकेवर काढले आहे. कपाशीच्या झाडाला सध्या ४० ते ५० या प्रमाणात पक्क्या कै-या तयार झाल्या आहेत, मात्र या बोंड अळीच्या रोगामुळे कै-या पूर्णपणे सडून वाया गेल्या आहेत. आतून पूर्णपणे कीड लागली आहे. गुलाबी, लाल रंगाच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. कपाशीचे पाते, फुले पूर्णपणे गळून चालले आहे.एकीकडे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कपाशीचे नुकसान झाले. तर दुसरीकडे बोंड अळीच्या रोगाचा प्रादुर्भाव या दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेवगाव तालुक्यात कपाशीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 4:02 PM