अहमदनगर : यंदा साखरेला तसेच गव्हाला चांगला दर मिळत आहे; मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळताच केंद्र सरकार धोरणे बदलतात. केंद्राची गहू व साखरेवरची निर्यात बंदी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना परिसरात सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी इथेनाॅल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर आधारित ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या संपादित ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचो. आता परिस्थिती बदलली आहे. साखर कारखानदारीने साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहण्याचे दिवस राहिले नाहीत. पूर्वी गुळाची बाजारपेठ होती. नंतर साखर कारखानदारी आली. आता मात्र साखर एके साखर म्हणायचे दिवस राहिलेले नाहीत.
बोधेगाव येथे सोमवारी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी पुत्र प्रताप यांना व्यासपीठावरच पुष्पहार घातला व मिठी मारली. ‘आजपर्यंत तुला जवळ घेतले नाही’ असे ते म्हणताच प्रताप यांना अश्रू अनावर झाले.