संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे संगमनेर आगाराची सेवा तब्बल ६२ दिवस बंद राहिली. या कालावधीत आगाराचे सरासरी ३ कोटी २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर आगारातून इतर वेळेस दररोज ५१४ फे-या होत होत्या. मात्र आता पुन्हा बससेवा सुरु होेणार असून मोजक्याच फे-या होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा बंद होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यात जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर आगारातून तब्बल ६२ दिवसांनी बससेवा सुरु होणार आहे. संगमनेर शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बु्रदूक व कुरण या दोन गावांमध्ये २३ मे रात्री बारा वाजेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर संगमनेर आगारातून २४ मे पासून जिल्हातंर्गत बससेवा सुरू झाली. आगारातून अहमदनगरकडे दररोज पाच फेºया होतील. यात पहिली बस सक ाळी सात, दुसरी बस सकाळी आठ, तिसरी बस सकाळी अकरा, चौथी बस दुपारी एक तर पाचवी बस दुपारी दीड वाजता सुटणार आहे. अहमदनगरला गेलेल्या बस ठराविक वेळेनुसार पुन्हा संगमनेरकडे रवाना होतील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अहमदनगरकडे जाणा-या व तेथून येणाºया प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. एका बसची आसन संख्या ४४ इतकी आहे. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्याकरिता एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी प्रवास करू शकतील. ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांखालील मुलांना बस प्रवासाची परवानगी नाही. कोपरगाव, अकोले, अहमदनगर, शेवगाव या आगाराच्या बसेस संगमनेर बसस्थानकात येतील. आलेल्या सर्वच बसचे देखील निर्जंतुकीकरण होणार आहे. बसस्थानकांवर गर्दी होऊ नये याकरिता साखळी पध्दतीने नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आगार एकमेकांना जोडण्यात आली आहेत.
प्रवाशांची काळजी घेण्यासाठी सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केल्या आहेत. प्रत्येक प्रवाशाने व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकाने सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करावे. या सर्वांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे, असे संगमनेरचे आगारप्रमुख बी. एन. शिंदे यांनी सांगितले.