अहमदनगर : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहेत; मात्र बारावीचे प्रॅक्टिकलच झाले नाही, बारावीला अंतर्गत गुणही नाहीत, शिवाय अकरावीला रेस्ट इयर समजले जात असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या असून मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या १८०३ शाळा आहेत. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने नुकतेच बारावी निकालाच्या अनुषंगाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. याशिवाय शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसह कमाल सात सदस्य असलेली निकाल समिती स्थापन केली जाणार आहे. हे मूल्यमापन सूत्र जाहीर झाले असले तरी बारावीचे प्रात्यक्षिक झाले नसल्याने तसेच गतवर्षी अकरावीची परीक्षादेखील झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. अनेक विद्यार्थी अकरावी हे रेस्ट इयर समजतात. त्यामुळे हवा तेवढा अभ्यास करत नाहीत. परिणामी अनेकांना अकरावीला कमी गुण असतात. त्याचा फटका यंदा बारावीच्या निकालात बसण्याची शक्यता आहे.
-----------
बारावीसाठी असे होणार गुणदान
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के अशा पद्धतीने १०० गुणांचे मूल्यमापन होऊन गुणदान होणार आहे.
-----------
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?
यंदा बारावीचे प्रॅक्टिकल झाले नाही. बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. त्यामुळे अंतर्गत गुणांनुसार गुणदान कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्र परीक्षा, चाचण्यादेखील ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत गुण देताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
--------------
प्रत्यक्षरित्या परीक्षा झाली असती, तर गुणदान प्रक्रियेत पारदर्शकता राहिली असती. दहावी आणि अकरावीतील गुण विचारात घेतले जाणार असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. बारावीला कमी गुण मिळाले तर पुढील प्रवेशावरही त्याचा परिणाम होईल.
- अरुण पवार, विद्यार्थिनी
---------------
बारावीचा अभ्यास विद्यार्थी अधिक जोमाने करतात. तुलनेत दहावी, अकरावी परीक्षेला कमी गुण असले तरी त्याचा करिअरवर फारसा परिणाम होत नाही. परंतु आता दहावी, अकरावीचे गुण विचारात घेऊन बारावीचे गुणदान होणार असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना नक्की बसणार आहे.
- स्नेहल गवळी, विद्यार्थिनी
--------------
हुशार विद्यार्थ्यांसाठी ही गुणदान पद्धत सोयीस्कर वाटत नाही. पण इतर विद्यार्थी या गुणदान प्रक्रियेतून सहज उत्तीर्ण होऊ शकतात.
प्रा. महेश पाडेकर, अकोले
----------------