श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिर्डी लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आला. वास्तविक मराठा आरक्षणाच्या मागणीला आपण सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. शिर्डीतून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्याची तयारी असून सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करू, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार तरुणांचा अमानुष छळ करण्यात आला होता. यातील पीडितांची आठवले यांनी साखर कामगार रुग्णालयात भीम घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे श्रीकांत भालेराव, विजय वाघचौरे, सुरेंद्र थोरात आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, मुंबई, पंढरपूर तर कधी शिर्डी मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणुका लढवल्या. त्यामुळे मतदारसंघाची बांधणी करता आली नाही. पंढरपूरमध्ये खासदार असताना ॲट्रॉसिटीच्या चुकीच्या केसेस दाखल केल्याचा खोटा प्रचार २०१४ च्या निवडणुकीत झाला. त्यामुळे शिर्डीतून आपला पराभव झाला. निवडणुकांमध्ये जय पराजय हा होत असतो. मात्र शिर्डीतून खासदार झाल्यास सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका राहील.
शिर्डीतून यावेळी नक्कीच आपला विजय होईल. राज्य सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार रखडले आहे. महामंडळावर नियुक्त झालेल्या नाहीत. लवकर विस्तार होऊन त्यात आरपीआयला स्थान मिळावे, अशी मागणी आठवले यांनी केली. राज्यात चार ते पाच लाख लोकांच्या उपस्थितीत मित्र पक्षांच्या दहा सभा घेणे गरजेचे आहे. त्यात आरपीआयचे झेंडे लावण्यात यावे. सरकारी कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना मानाचे स्थान द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली.