साहेबराव नरसाळेअहमदनगर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यासाठी सोशल मीडिया वॉर रुमची स्थापना प्रत्येक प्रमुख उमेदवारांनी उभी केली आहे़ आपल्या उमेदवारांसाठी ही सोशल मीडियातील तज्ज्ञ तरुणांची टीम ८ ते १४ तास राबत आहे़ या टीमवर उमेदवार लाखो रुपये खर्च करीत असल्याचे सांगण्यात येते़अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाखावर पोहोचली आहे़ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १८ लाख तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात १५ लाख मतदार आहेत़ फेसबुक सांख्यिकीकडील माहितीनुसार नगर जिल्ह्यात ३ लाखापेक्षा अधिक लोक फेसबुक वापरतात़ मात्र, यात फेक अकाउंटस् आणि निष्क्रिय अकाउंटसचा आकडाही मोठा आहे़ तर ४५ लाख लोकसंख्येमागे सुमारे १५ लाख लोक व्हॉटस्अॅप वापरतात़ व्हॉटस्अॅप, फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या शहरी भागात जास्त असून, ग्रामीण भागात तरुणांकडूनच सोशल मीडियाचा वापर होतो़ मात्र, ग्रामीण भागातील सोशल मीडियाचा वापरही नियमित होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ जे लोक फेसबुक वापरतात, त्यातील ९० टक्के लोक व्हॉटस्अॅपही वापरतात़ त्यामुळे या सोशल मीडियातील तरुण आणि शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी आपली सोशल मीडिया (आयटी सेल म्हणूनही संबोधले जाते) टीम अॅक्टीव्ह केली आहे़ त्यामुळे ५०० जणांना निवडणूक काळात रोजगार मिळाला आहे़ सोशल मीडियावरच्या प्रचारात निर्मितीक्षम (क्रिएटीव्ह) व स्वयंसेवक (व्हॉलिंटीअर्स) असे दोन गट सक्रिय झाले आहेत़ यात निर्मितीक्षम टीमवर उमेदवारांकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे़ मात्र, स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले मेसेज फॉरवर्ड करीत आहेत़असं चालतं आयटी सेलचं कामफेसबुकवरुन प्रचार करताना आयटी सेलकडून सर्वप्रथम फेक अकाउंटस उघडले जातात़ त्यानंतर उमेदवारांचे पेजेस तयार केले जातात़ काही पेजेस नि:पक्ष भासतील असे असतात, पण त्यावरुन ठराविक एका उमेदवाराची प्रतिमा तयार करण्याचे काम नकळत केले जाते़ काही मतदार राजकीय पेजेसपेक्षा नि:पक्ष पेजेसवर विश्वास ठेवतात़ त्यामुळे अशा मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी हे पेजेस उपयुक्त ठरतात़ हे पेजेस, फेसबुक अकाउंट आयटी सेलची टीम चालवते. आयटी सेलच्या टीमचेही कामावरुन वेगवेगळे प्रकार आहेत़ त्यात मीम्स् तयार करणारे, कार्टून काढणारे आणि मजकूर पुरविणारे प्रकार दिसतात़अॅक्टीव्ह आणि रिअॅक्टीव्ह प्रकारफेसबुकवरुन आपल्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रतिमा निर्मिती करणारे अॅक्टीव्ह प्रकारात मोडतात़ तर विरोधी उमेदवाराच्या मुद्यांना खोडून काढणारे रिअॅक्टीव्ह प्रकारात मोडतात़ जसं राहुल गांधी यांचे ‘चौकीदार चोर है’ हे अभियान अॅक्टीव्ह कॅम्पेनिंगचा भाग तर नरेंद्र मोदी यांचे ‘मै भी चौकीदार हूँ’ हे अभियान रिअॅक्टीव्ह कॅम्पेनिंग प्रकारात मोडतं़विरोधी उमेदवाराच्या कॅम्पेनिंगची धार कमी करण्यासाठी रिअॅक्टीव्ह कॅम्पेनिंग राबविले जाते़ त्याशिवाय मीम्स् हा प्रकार विरोधी उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रभावी मानले जाते़ यात विरोधी उमेदवाराच्या फोटोवर मार्मिक शब्दात टीका, टिप्पणी केलेली असते़ मीम्स् पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता अधिक असते़ मात्र, त्या तुलनेत कार्टून हा प्रकार निर्धोक व सर्वमान्य, रुळलेला आहे़ त्यामुळे मीम्स्पेक्षा कार्टूनवर भर देण्याचा उमेदवारांचा आग्रह असतो़ मात्र, कार्टूनिस्ट कमी असल्यामुळे अनेकांना मीम्स्वरच भागवावे लागते, असे यातील तज्ज्ञ सांगतात़ कन्टेंट (मजकूर) पुरविणारे फेसबुक किंवा व्हॉटस्अॅपवर शेअर करण्यासाठी लेख, थोडक्यात पण मार्मिक टिप्पणी करणाºया पोस्ट तयार करतात़ व्हॉटस्अॅप कॅम्पेनिंगमध्ये ग्रुप्स् तयार केले जातात़ पगारी निर्मितीक्षम (क्रिएटीव्ह) टीमने तयार केलेले मेसेज विविध ग्रुप्स्वर स्वयंसेवक (व्हॉलिंटीअर्स) विनामोबदला प्रसारित करतात़