संगमनेर : स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी (दि.०७) संगमनेरातील जाणता राजा मैदान येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरात येणार असताना विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरातून जाणारा नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला आहे. बसस्थानकासमोर आंदोलन सुरू केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथीला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजीमंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे) नेते भास्कर जाधव हे देखील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शुक्रवारी (दि.०५) संगमनेर शहरात हिंदुत्ववादी संघटना आणि श्रीराम भक्तांनी एकत्र येऊन आमदार आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.