१४ फेब्रुवारी म्हटले की, व्हॅलेंटाईन डे. प्रेम, भावना विश्वात रममाण झालेल्या तरुणाईचा दिवस. पण जगात अशी काही माणसं असतात ते माणसांबरोबरच निसर्ग, प्राणी, पक्ष्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करतात.साप म्हटलं की मृत्यू. पण मृत्युशी मैत्रीचा धागा गुंफत श्रीगोंद्यात उमेश राऊत यांनी साप, पशू- पक्ष्यांशी मैत्री करुन सरपटणाऱ्या हवेत उडणाºया हजारो मित्रांचे प्राण वाचविण्याची कामगिरी केली आहे.उमेश राऊत हे नाभिक समाजातील. शाळेत डोके चालेना म्हणून सहावीतून शाळा सोडली. मित्रांसमवेत निसर्गात भटकंती सुरू केली आणि पोटाची खळगी भरण्यासाठी सलूनचे दुकान थाटले. पण निसर्गप्रेमी आले की दुकान बंद. उमेशची स्वारी निघाली जंगलाकडे. बालपणी त्यांची मैत्री संजय हिंगसे या सर्पमित्राशी झाली. स्वत:चा जीव धोक्यात घालून साप पकडणे आणि जंगलात सोडून देण्याचे वेडच उमेशला लागले.डॉ. शिवाजी पवळ यांच्याशी मैत्री झाली. सापाप्रमाणे पशू-पक्ष्यांवर प्रेम करण्याचा छंद जडला. साप, पशू - पक्ष्यांची वसाहत म्हणजे जंगल कमी झाले. हे पाहून उमेशने वडाळी सरस्वती नदीच्या कडेने वृक्षारोपण केले. उमेश हा निसर्गात मुक्तपणे वावरणाºया साप, पशू-पक्ष्यांचा दोस्तच बनला. त्यासाठी कुणाकडून एक रुपयाची अपेक्षा नसते.आतापर्यंत या अवलियाने हजारो सापांना निसर्गात मुक्त केले. जखमी पक्ष्यांना जीवनदान दिले. वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून पक्ष्यांची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कुंड्या वाटपाचे काम उमेश, त्याचे सहकारी नि:स्वार्थ भावनेने करतात.- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : मृत्युशी मैत्रीचा धागा गुंफणारा प्रेमवेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:57 AM