अहमदनगर : लव्ह जिहादचा कायदा झालाच पाहिजे, गडकिल्ल्यांवरील मजारी हटवाव्यात, महाराष्ट्रातील मदरसे बंद करावेत, टिपू सुलतान-औरंगजेबाची जयंती साजरी करणाऱ्यांना सजा झाली पाहिजे, मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, अशा विविध मागण्या ज्येष्ठ पत्रकार व एका टीव्ही चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले.
नगरमधील सावेडी जॉगिंग पार्कवर हिंदू जनजागृती समितीच्यावतीने हिंदू जनजागरण सभा घेण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती संघटनेचे संघटक सुनील घनवट, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, रणरागिनी शाखेच्या अध्यक्षा रागेश्री देशपांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. चव्हाणके यांनी उपस्थितांना हिंदू राष्ट्राची शपथ दिली. चव्हाणके म्हणाले की, भारतात कठोर जनसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे, हिंदू राष्ट्र घोषित करा, अशा विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात. त्यासाठी हिंदूंनी एकजूट दाखवावी. मी मुस्लीम मुलींना हिंदू धर्मात येण्यासाठी ऑफर आणली आहे. मुस्लीम मुलींनी हिंदू मुलांसोबत विवाह केल्यास त्यांची अनेक जाचातून सुटका होणार असल्याचेही ते म्हणाले.
सनातन संस्थेचे जाधव म्हणाले, सनातन धर्मामुळेच भारत देश विकासाच्या शिखरावर पोहोचला होता, पण आता देशात पाश्चात्त्य संस्कृती वाढत आहे. लव्ह जिहाद वाढतो आहे. धर्मनिरपेक्ष व्यवस्थेमुळे देशात हिंदू धोक्यात आला आहे. धर्मग्रंथांचे विडंबन, हिंदूंच्या हत्या, देवतांचे विडंबन, साधूंच्या हत्या होत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण करून निधीची लूट होत आहे. संविधानातील असमानतेमुळे हिंदू धर्माला संरक्षण मिळत नाही. त्यामुळे हिंदू असुरक्षित झाला आहे. आपले कायदे बनवताना हिंदू धर्माचा आधार घेतला नाही. इतर धर्मांना राजकीय संरक्षण देण्यात आले आहे. कोणताही आयोग हिंदूंसाठी नाही. घटनेत समानतेचे तत्त्व आहे, पण ही समानता हिंदूंसाठी नाही. घटनेच्या माध्यमातून हिंदूंवर अन्याय केला जात आहे. म्हणूनच हिंदू राष्ट्र आवश्यक आहे. २०२५ मध्ये हिंदू राष्ट्राची पहाट दिसेल, असे ते म्हणाले.
आमचं नगर अहिल्यानगर
कार्यक्रमात नगरच्या नामांतराच्या घोषणा देण्यात आल्या. आमचं नगर अहिल्यानगर अशा घोषणा या कार्यक्रमात काही तरुणांनी दिल्या. तरुणांच्या या घोषणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.