मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : २०१७-१८ ऊस गळीत हंगामातील साडेतीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळपाचे प्रमाण वाढत असतानाच साखरेच्या उता-यातही वाढ होऊ लागली आहे. या हंगामात उतारा वाढल्यास त्यानुसार पुढील हंगामात ऊस उत्पादकांना उता-याच्या प्रमाणात जादा दराने एफ. आर. पी. ची रक्कम मिळू शकणार आहे.१ नोव्हेंबरपासून यंदा राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. १५ नोव्हेंबरपर्यंत साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर उपप्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील १३ सहकारी व ८ खासगी अशा २१ कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.६३ टक्के होता. १८ डिसेंबरला २४ कारखाने सुरू असताना ३९.९५ मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९.३३ टक्के सरासरी उतारा निघाला. ९ जानेवारीस २६ कारखान्यातून ६१.८० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९.८३ टक्के एवढा सरासरी उतारा निघाला. १३ फेब्रुवारीअखेर २२ कारखाने सुरू असून ८७ लाख १२ हजार ५६७.५९ मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९० लाख ८७ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन १०.४३ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. या हंगामातील हा सर्वोच्च साखर उतारा गणला जातो.
गाळपात अंबालिका, ज्ञानेश्वर, विखेची आघाडी
अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांमध्ये भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. १३ फेब्रुवारीअखेर या कारखान्याने ७ लाख ९ हजार ९०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ५९ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून १०.७ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. खासगी अंबालिका कारखान्याने खासगी व सहकारी अशा सर्वच कारखान्यांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६३ हजार ३१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ९१ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन करताना ११.२ टक्के उतारा मिळविला आहे. उताºयामध्ये प्रवरानगरच्या पद्मश्री विखे कारखान्याने ११.१२ टक्के सरासरी उतारा मिळवित उताºयात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. १३ फेब्रुवारीअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ८ खासगी व १४ सहकारी अशा एकूण २२ साखर कारखान्यांमधून ८७ लाख १२ हजार ५६७.५० मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ९० लाख ८७ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.