अहमदनगर : गर्भवती महिलांच्या डोहाळे जेवणाचे अनेक कार्यक्रम होतात. मात्र, नगर शहरातील सावेडी भागात पाळीव श्वानाचाही अनोखा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात आला. येथील कुलकर्णी परिवाराने ल्युसीचे डोहाळे पुरवले. ‘कोणीतरी येणार... येणार गं...’ या गाण्यावर महिला व पुरुषांनी तालही धरला. माणसांवर प्रेम करणाऱ्या प्राण्यांवरही प्रेम करण्याचा अनोखा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
सावेडी येथील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी यांनी लहासा ऑप्सो जातीच्या ‘ल्युसी’ या श्वानाला पोटच्या मुलीप्रमाणे लाडाने मोठे केले. त्यांना ल्युसीच्या आयुष्यात प्रथमच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची ‘गुड न्यूज’ कळाली. मग या आनंदाचाही सोहळा करण्याचा निर्णय कुलकर्णी परिवाराने केला. ल्युसीचेही मुलीप्रमाणे साग्रसंगीत डोहाळे जेवण साजरे केले. टीव्हीमधील डान्स स्पर्धेतील विजेता व अभिनेता राहुल कुलकर्णी व शैला कुलकर्णी यांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले.
स्वागत कमान, सजवलेला झोका व धनुष्यबाण, परिसरात फुलांची सजावट, पारंपरिक गाणी, एवढाच नव्हे तर गर्भवती महिलेप्रमाणे हिरवी साडी-चोळीचा ड्रेस घालून व हेअरस्टाईल करून नटवण्यात आले. परिसरातील महिलांनी तिला औक्षण करून ओटीही भरली. हा सर्व प्रकार ल्युसीला समजत नसला तरीही ती झोक्यावर शांत बसून हे सगळे करवून घेत होती. पेढा की बर्फीच्या वाट्या ल्युसी पुढे धरल्या असता तिने बर्फीच पसंत केल्यावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. गोड अल्पोपहाराने या अनोख्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमास सहायक फौजदार राजेंद्र गर्जे, मोहन जगताप, माधव देशमुख, वरदा जोशी, श्रेय कुलकर्णी, स्वाती शेवाळे, रूपाली मुळे, जानव्ही जोशी, श्रावणी कुलकर्णी, कल्पना जगधने, सुमती जोशी आदी उपस्थित होते.
-------
आपण प्राण्यांवर प्रेम केल्यास ते सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. ल्युसीला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आम्ही लहानाचे मोठे केले. अत्यंत शांत व हुशार असलेल्या ल्युसीला बोललेले सर्व कळते. आम्ही जिथे जाऊ तेथे ती आमच्याबरोबर असते. मालिका व चित्रपटांच्या शूटिंगच्या सेटवरही ती माझ्याबरोबर असते. म्हणूनच आमच्या लाडल्या ल्युसीच्या पहिल्या बाळंतपणाची चाहूल लागल्यावर आम्ही उत्साहात या तिच्या डोहाळे जेवणाच्या अनोख्या सोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने आयोजन केले.
-राहुल कुलकर्णी, अभिनेता, डान्सर
--------------
फोटो-१०ल्युसी १
सावेडी भागातील कुलकर्णी परिवाराने ल्युसी श्वानाचे डोहाळे जेवण करून प्राण्यांवर प्रेम करण्याचा अनोखा संदेश दिला. या सोहळ्याप्रसंगी अभिनेता राहुल कुलकर्णी व परिवारातील सदस्य.