चंद्रकांत शेळके, अहमदनगर : जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी संसर्ग आता हळूहळू ओसरू लागला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे बाधीत जनावरे होती. परंतु सध्यस्थितीत हा आकडा केवळ ३३ एवढाच राहिला आहे.
ऑगस्ट २०२२ पासून राज्यासह जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सुरू झाला. प्रारंभी बाधित जनावरांची संख्या व बाधित होण्याचा वेगही कमी होता. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने आवश्यक उपचार करण्यासह लसीकरणावर भर दिला. दिवाळीच्या आधी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवून १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले; परंतु लसीकरणानंतरही बाधित जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. १ नोव्हेंबरपासून बाधित जनावरांत व मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ नोंदवली गेली.
१०० टक्के लसीकरण, बाधित जनावरांवर तातडीने उपचार, गावात, गोठ्यात धूर फवारणी असे सर्व उपाय करूनही लम्पी आटोक्यात येत नसल्याने पशुसंवर्धन विभागही हतबल झाला होता. राज्य व जिल्हा परिषदेचा पशुसंंवर्धन विभाग, तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, तसेच खासगी, शासकीय पशुचिकित्सक, निवृत्त पशुधन अधिकारी, कंत्राटी भरती केलेले कर्मचारी, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असे सर्वजण प्रयत्न करत होते. तरीही लम्पीचा प्रसार वाढतच होता.
नोव्हेंबरपर्यंत ३० हजार जनावरे बाधित झाली. शिवाय मृतांचा आकडाही वाढला. दरम्यान, डिसेंबरनंतर पाऊस उघडल्यावर लम्पी आटोक्यात येऊ लागला. जानेवारी, फेब्रुवारीत बाधित जनावरांचे प्रमाण कमी झाले; मार्च महिन्यात जिल्ह्यात ३३३ बाधित जनावरे होती. आता एप्रिल महिन्यात आतापर्यंत केवळ १६ बाधित आले असून सद्यस्थितीत एकूण आकडा ३३ आहे.मृत ४३८४ जनावरांपोटी आर्थिक मदत
लम्पीने जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यास काही आर्थिक मदत केली जाते. त्यानुसार दुभत्या जनावरास ३० हजार, बैल २५ हजार, तर वासरासाठी १६ हजार रुपयांची तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. आतापर्यंत मृत ४,३८४ जनावरांपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. अजून काही प्रस्ताव शिल्लक आहेत.जिल्ह्यातील लम्पीचा आढावा
आतापर्यंतचे बाधित जनावरे - ५६ हजार ५५९उपचाराने बरे झालेले - ५२ हजार १४६सद्य:स्थितीतील बाधित जनावरे - ३३एकूण जनावरांचा मृत्यू - ४३८४नुकसान भरपाई - ४३८४
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"