बाळासाहेब काकडेश्रीगोंदा (जि. अहमदनगर):
एक काळ असा होता की, केवळ एखाद्या साहेबाला ने-आण करण्यासाठी मोटारगाडी असायची. पण, काळ बदलला असून शेतामध्ये शेतमजुरांची कमतरता भासू लागल्याने मजुरांना कामावर ने-आण करण्यासाठी बागायतदार आलिशान कार घेऊन मजुरांच्या दारात जात असल्याचे आजचे चित्र आहे. मजुरांच्या गरजेनुसार त्यांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असून शेतात गेले की, पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे ऊस फळबागांमध्ये वाढ झाली आहे. युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तशी तसा शेतात काम करणाऱ्या मजुरांची टंचाई निर्माण झाली.
द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने ही कामे परप्रांतीय मजूर ‘धोका’ पत्करून करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. मजुरांच्या श्रमाला चांगलीच प्रतिष्ठा मिळाली.