अहमदनगर : आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याशिवाय अनेक गावात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण लढा देत आहेत. अनेक भटके , आदिवासी कुटुंब गावागावात अडकून पडले आहेत. या कुटुंबीयांना आधार मिळावा, यासाठी सामाजिक जाणीवेतून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच भावनेतून मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून भटक्या, आदिवासी, गरजू कुटुंबीयांना ज्वारी, गहू , बाजरी, तांदूळ धान्यासह किराणा मालाचे वाटप केले जात आहे. जवळपास १५० कुटुंबीयांना आतापर्यंत मदतीचे वाटप केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अन्नधान्य व रोख स्वरुपात मदत गोळा केली होती. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, अशोक म्हस्के, विठ्ठल म्हस्के, आयुब शेख व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला होता. मदत गोळा झाल्यानंतर या मदतीचे त्यांनी नियोजनपूर्वक वाटप केले. दरम्यान, रविवारी (दि.५ एप्रिल) हिवरा येथील २२ कुटुंबातील १०२ व्यक्तींना मदतीचे वाटप केले. यातील १८ कुटुंब जडीबुटीचा व्यवसाय करणारे आहेत. तर चार कुटुंब रोजंदारीवर काम करणारे आहेत. याप्रसंगी कार्यकर्ते मुरलीधर लगड, अशोक लगड, अॅड. योगेश लगड, भारत चव्हाण, राहूल लगड, मारुती लगड व इतर उपस्थित होते. सॅनेटायझर्स, डेटॉल साबणाचे वाटपआष्टी तालुक्यातील गंगादेवी शेडाळा, सावरगाव, शेंडगेवाडी, शिंदेवाडी, घाटदेवळगाव, पिंपळगाव घाट, अरणविहिरा, तागडखेल परिसरातील ३५ गावात मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सॅनेटायझर्स, डेटॉल साबण वाटप केले. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्याविषयी प्रबोधन केले. तर काही गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.मदतीचे आवाहनकोरोनामुळे अनेक भटके, आदिवासी, गरीब कुटुंब अनेक गावात अडकून पडले आहेत. त्यांना रोजगार नसल्याने उपासमार सुरू आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची आज खरी गरज आहे. तरी विविध संस्था, दानशूर व्यक्ती, युवकांंनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.
आज प्रत्येक गावात गरजू, गरीब लोकांना कोणतेही रोजगाराचे साधन नाही. त्यांची उपासमार होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वांनी आपल्या परिसरातील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन हिवरा येथील कार्यकर्ते अॅड.योगेश लगड यांनी केले आहे.