जामखेड : जामखेडच्या दुहेरी हत्याकांडात पिस्तूलचा वापर आरोपींनी केला होता. या आरोपीस पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय ४५, सैंदवा, जि. बडवानी. मध्यप्रदेश) यास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.२९ एप्रिल शनिवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेड - बीड रस्त्यावर बाजार समितीच्या समोरील चहाच्या दुकानासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांचेसह त्यांचे मित्र चहा पित असताना आरोपी गोविंद गायकवाड याने योगेश राळेभात याच्यावर पिस्तूलातून तीन गोळ्या छातीवर मारल्या होत्या. तर राकेश ऊर्फ रॉकी राळेभात याच्यावर दुस-या आरोपीने गोळ्या घालून हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गोविंद गायकवाड यासह सहा आरोपींना अटक केली होती. यातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याने पिस्तूल कोठून आणले याचा तपास पोलीस करीत असताना मध्यप्रदेशातील नाव समोर आले. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना प्राप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, गणेश गाडे, बेलेकर यांचे एक पथक मध्यप्रदेशला पाठविण्यात आले. या पथकाने तीन दिवस तपास करून पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार अंग्रेजबाबा यास अटक करून जामखेड येथे शनिवारी सकाळी आणले.