या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.१०) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावित्रा बाबूराव गडाख (५५, रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला अनेक दिवसांपासून चक्कर येणे, अशक्तपणा हा त्रास जाणवत असल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. मात्र, गुण येत नसल्याने भावाच्या सांगण्यावरून त्या पतीसह सावित्रा गडाख या मांत्रिकाकडे गेल्या होत्या. भूतबाधा झाली असून ती काढावी लागेल, असे मांत्रिकाने त्यांना सांगितले.
जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा त्या पतीसह मांत्रिकाकडे जायच्या. त्यावेळी उदी व अंगारा पाण्यातून घेण्यास तो सांगायचा. तसेच येताना मद्याची बाटली, विडीचा बंडल व सोबत दोनशे रुपये घेऊन येण्यास सांगत असे. २३ एप्रिलला या सर्व वस्तू घेऊन महिला तिचा पती व मुलगा असे तिघे जण दुचाकीने मांत्रिकाकडे वस्तीवरील पठारावरील पोल्ट्री फार्मवर रात्री आठला पोहोचले होते. मध्यरात्री एक वाजता मांत्रिकाने या महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध मद्य प्राशन करण्यास सांगितले व नंतर शेतात नेत तिच्यावर अत्याचार केले होते. पोलिसांनी पीडित महिलेची फिर्याद दाखल केली असून मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला सोमवारी ताब्यात घेत अटक केली.
----------------
फिर्याद देण्याकरिता पुढे यावे
सावित्रा गडाख याच्याकडे चौकशी केली असता त्याने भूतबाधा काढण्याच्या उद्देशाने अनेक महिलांवर अत्याचार केला आहे. तरी ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे. त्यांनी फिर्याद देण्याकरिता पुढे यावे. असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे. पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.