श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील युवा शेतकरी नितीन व राम अरुण कोठारे बंधूंनी दहा गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली. नैसर्गिक परिस्थितीवर मात करत, उत्पादन खर्च जाता १ लाख ७५ हजारांची कमाई केली.
नितीन कोठारे हे बी.टेक, तर राम यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आहे. या बंधूंनी १६ एकर क्षेत्रात डांळिब, द्राक्षे, जांभूळ शेती फुलविली. नितीन कोठारे यांनी विंटर डाऊन व नाभीला या वाणाची स्ट्रॉबेरीची रोपे महाबळेश्वरवरून आणली. गादी वाफे, मल्चिंग पेपरचा वापर करून, दहा गुंठे क्षेत्रात लागवड केली. त्यासाठी कृषी मंडल अधिकारी संदीप बोरगे यांनी मार्गदर्शन केले आणि प्रतिकूल हवामानातही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखविली.
जगाचा विचार केला, तर एकट्या चीनमध्ये स्ट्रॉबेरीचे ४० टक्के उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. कोठारे बंधूंनी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला. ते याची विक्री श्रीगोंदा व सिद्धटेक येथे करीत आहेत.
------
वेलची लागवड करणार..
हवामानानुसार पीक घेण्याची पद्धत बदलत आहे. स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून, पुढील एक एकर क्षेत्रात वेलची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. हा प्रयोग यशस्वी होईल. त्यासाठी मेहनत घेणार आहे, असे नितीन कोठारे यांनी सांगितले.
----
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. त्यामुळे शेतीतील पीक पद्धती बदलत नितीन व राम कोठारे यांनी स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन अपेक्षित नफा मिळविला. स्ट्रॉबेरीची गोडी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीपेक्षा चांगली आहे.
-संदीप बोरगे, कृषी मंडल अधिकारी
----
२१ श्रीगोंदा स्ट्रॉबेरी, १
बेलवंडी कोठार येथील कोठारे बंधूंची स्ट्रॉबेरीची शेती.