संगमनेर : धांदरफळ बुद्रुक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या आंदोलन करून सुजय विखे यांच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. थोरात समर्थकांवरही तोडफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
शुक्रवारी रात्री वसंत देशमुख यांनी जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या घटनेनंतर थोरात समर्थकांनी विखे समर्थकांच्या गाडीची तोडफोड करून वाहन पेटवले. विखे समर्थकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थोरात समर्थकांनी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जे काही घडले ते कुणालाही न शोभणारे, अत्यंत वाईट आहे. अशाने कोणती महिला राजकारणात येणार? मी असे काय केले की, माझ्याबद्दल एवढे वाईट बोलले? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असे बोलणे शोभते का? - डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस
थोरात समर्थकांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून व जाळून दहशतीचे दर्शन राज्याला घडविले आहे. माझ्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. - सुजय विखे पाटील, माजी खासदार
वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप निषेध करत असून असे वक्तव्य खपवून घेणार नाही. पक्षातर्फे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलिस, महिला आयोगाने कडक कारवाई करावी. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप
- राज्य महिला आयोगानेही या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेतली आहे. याबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचा अहवाल तत्काळ आयोगाकडे पाठवावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले.