Maharashtra Assembly Election 2024 : अहिल्यानगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डाॅ. सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राधाकृष्ण विखे यांना आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात रोखण्याचा प्रयत्न आहे. यावेळी विखे यांचा सामना शिर्डी मतदारसंघातील माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा प्रभावती घोगरे यांच्याशी आहे.
विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे. पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली. नंतर शिवसेना, काँग्रेस व सध्या भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. त्या विखेंच्याही नातेवाईक आहेत. विखे यांच्याकडे दीर्घ अनुभव व विकासकामांची पार्श्वभूमी आहे. घोगरे प्रभावी वक्ता व आक्रमक आहेत. त्यामुळे लढत रंगतदार झाली आहे.
थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष शिर्डी मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील २८ गावांतील ६७ हजार मतदान आहे. संगमनेर हा थोरातांचा तालुका आहे. कोपरगाव तालुक्यातील भाजप नेते विवेक कोल्हे यांचा शिर्डी मतदारसंघातील गणेश कारखाना परिसरातील गावांशी संपर्क आहे. गणेश कारखाना थोरात-कोल्हे यांनी विखेंच्या विरोधात जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही भागातील मते निर्णायक आहेत.
पुनरावृत्ती होणार ? शिर्डीत महायुतीच्या खासदारांचा पराभव होऊन भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. विखे यांचे विरोधक थोरात, नीलेश लंके यांनी आता शिर्डीत लक्ष केंद्रित केले आहे. ‘लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभे’तही असा त्यांचा नारा आहे. विखे विरोधक विवेक कोल्हे भाजपमध्ये आहेत. मात्र, ते विखेंना मदत करणार की तटस्थ राहणार हे स्पष्ट झालेले नाही.
२०१९ मध्ये काय झाले?गतवेळी विखे पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश जगन्नाथ थोरात यांचा ८७ हजार २४ मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे विशाल बबन कोळगे यांना ५,७८८ मते मिळाली.
निवडणुकीतील कळीचे मुद्देनिळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय हा या मतदारसंघातील प्रमुख मुद्दा आहे. विखे, थोरात हे दोन्ही नेते या कामाचे श्रेय घेत आहेत. शिर्डीत एमआयडीसीला जागा दिली, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी परत केल्या, विकासाचे प्रकल्प आणले हा विखे यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. विखे दहशत करतात, चाळीस वर्षे सत्ता असताना त्यांनी काहीच केले नाही असा आरोप काँंग्रेस करत आहे.