Maharashtra Assembly Election 2024 : पारनेर (जि. अहिल्यानगर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या स्थिर स्थायी पथकाने गुरुवारी (दि. ३१) सकाळी २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. पंचनामा व इतर कार्यवाही करून शुक्रवारी दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर व कंपनीच्या प्रतिनिधींसमोर यासंबंधीचा १५ पानी पंचनामा केला. कारवाईतील सोन्या-चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा केले आहेत. बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर व पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी सांगितले.
बीव्हीसी लाॅजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार हनुमंत कट्टीवल्ली (वय २९, रा. वारजे माळवाडी, ता. हवेली), भय्यासाहेब प्रकाशराव बनसोडे (२७, रा. साळुंके विहीर, जि. पुणे), दिगंबर भगवानराव काजळे (४३, रा. वाघोली खांदवे नगर, ता. हवेली), असिस्टंट मॅनेजर गोरख कुंडलिक भिंगारदिवे (४१, रा. भोसरी, ता. हवेली) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
दागिने घेऊन मुंबईहून निघाली जीप...मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी व हिरे, मोत्याचे दागिने घेऊन कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी चालले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.