आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही
By अण्णा नवथर | Published: October 30, 2024 07:04 PM2024-10-30T19:04:43+5:302024-10-30T19:05:52+5:30
थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली.
अहिल्यानगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या व्यासपीठावर जात भाषण दिले. मात्र या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीचा पुरस्कार केला नाही किंवा महायुतीवर टीकाही केली नाही.
संगमनेर तालुक्यात थोरात व विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. भाजपचे माजी खासदार डॉ .सुजय विखे यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांचेबाबत वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्याचे पडसाद उमटून तालुक्यात वाहनांची जाळफोड व तोडफोड झाली. या घटनेबाबत तांबे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महिलांची अवमान करण्याची संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही असे म्हटले होते. थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. सभेत बोलताना त्यांनी संगमनेर तालुक्यातील सहकार, राजकारण व सामाजिक क्षेत्रातील संस्कृतीचा उहापोह करताना 'आम्ही या तालुक्यात लहानाचे मोठे झालो. मात्र अशी राजकीय संस्कृती आजवर पाहिली नाही' अशा शब्दात विखे यांचेवर टीका केली.
थोरात यांना विक्रमी मतांनी विजयी करून या प्रवृत्तीला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र संगमनेर तालुक्याचे स्थानिक संदर्भ वगळता महाविकास आघाडी व महायुतीच्या राजकारणाबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. सभेत व्यासपीठावरील सर्व नेत्यांनी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. तांबे यांनी मात्र काँग्रेसचा गमछा घातला नव्हता. तांबे यांच्या या राजकीय तटस्थतेची चर्चा सुरू आहे.