संगमनेर : धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. सभेनंतर धांदरफळ येथे महिलांनी देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. महिला व्यासपीठावर गेल्या. तेथे महिलांनी ठिय्या मांडला आहे. देशमुख यांना येथे बोलवावे. त्यांचेवर कारवाई करावी त्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. सरपंच उज्ज्वला देशमाने यांसह अनेक महिला या आंदोलनात सहभागी आहेत.
अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे फलक फाडण्यात आले आहेत. विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली आहे. तालुका पोलीस स्टेशनला डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, अमर कतारी, सीताराम राऊत आदींसह रात्री उशिरा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, भर सभेत आमच्या बहिणीवर शिंतोडे, प्रचाराला बाहेर कशी पडते ते पाहू अशी धमकी, लाडकी बहीण म्हणून मतांसाठी खोटे कौतुक आणि थेट जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या थराची भाषा, भाजपाचे हे ढोंग जनतेला स्पष्ट दिसतंय अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.
या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आलीय - सत्यजित तांबे
सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे. ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच अशी संतप्त भूमिका आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.