Sharad Pawar Slam Ram Shinde : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राम शिंदेंनी १० वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला, असं म्हणत शरद पवार यांनी जोरदार टीका केली. तसेच जीवन बदलण्यासाठी जे जे करावे लागेल त्यात रोहित पवार अजिबात मागे राहणार नाही असेही शरद पवारांनी म्हटलं.
"या तालुक्याला दहा वर्ष एक आमदार होता, तो पाच वर्ष मंत्री होता, सत्ता हातात होती, सरकार त्यांच होतं काय दिवे लावले? दहा वर्षात केलं काय? काही केलं नाही. आज सांगतात भूमिपुत्र! मला कोणीतरी सांगितलं मी काही अलीकडे आलो नाही, मागे एकदा मी चोंडीला आलो होतो अहिल्यादेवींच्या दर्शनाला. माझ्या लक्षात आलं की, इथे मोठं बंगला बांधताहेत कोणीतरी. म्हटलं आता अहिल्यादेवी गरिबांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या भगिनी, हा तालुका दुष्काळी. हा चोंडीला बंगला कोणाचा होतोय? तुम्हाला माहित आहे का? चोंडीला जाऊन एकदा बघा, त्या ठिकाणी कसा बंगला बांधताहेत. म्हणतात दुष्काळी, सांगतात गरिबांसाठी आमचं राजकारण. पण टोलेजंग बंगला हा त्यांच्याकडे याचा अर्थ एकच आहे की विकास केला पण विकास तुमचा नाही, विकास स्वतःचा. जो स्वतःचा विचार करतो, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, कष्टकऱ्यांकडे लक्ष देत नाही. असे लोक मताची मागणी करायला तुमच्याकडे आली तर त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मतांचा पाठिंबा द्यायचा नाही, हे तुम्हाला मला करायचं आहे," असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
"कर्जतच्या ३० गावांचा, जामखेड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा आहे. एमआयडीसी आणायची आहे त्या संबंधित निकाल घेतला. एके ठिकाणी एमआयडीसी काढायचं ठरलं राज्य आमचं पडलं दुसऱ्यांचं राज्य आलं इथले माजी आमदार सध्याचे आमदार त्यांच्या हातात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय? एमआयडीसी किंवा कारखाने आणले असते तर मी कौतुक केलं असतं. पण जिथे जागा आहे एमआयडीसीची ती जागा बदलली, ती दुसरीकडे हलवली. काही काम त्या ठिकाणी केलं नाही. आज या राज्यामध्ये बेकारांची बेकारी घालवायची असेल तर हातांना काम द्यावे लागेल आणि हातांना काम द्यायची असेल तर एमआयडीसी उभी करावी लागेल," असं शरद पवार यांनी म्हटलं.
"रोहित पवार यांनी प्रयत्न करून एमआयडीसी आणली. आता एमआयडीसी आणून पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. माझं स्वच्छ मत आहे की, पुढच्या पाऊलांसाठी रोहित पवार यांचे कष्ट आहेत. पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या शब्दाची किंमत करा. उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी विजयी करा. तुम्हाला खात्री देतो की कर्जत जामखेड इथलं चित्र इथे जे परिवर्तन करायचंय आपण सगळे एक होऊ, प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल? याची खबरदारी आपण घेऊ. मी तुम्हाला खात्री देतो तुम्हा सगळ्यांचे जीवन बदलण्यासाठी जे जे करावे लागेल ते करण्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही, हीच खात्री या ठिकाणी देतो," असंही शरद पवार यांनी म्हटलं.